सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
देऊळगाव राजा येथील नगर परिषद मराठी प्राथमिक शाळा क्रमांक ४ च्या सहाय्यक शिक्षिका रेखा जोरावल यांनी कोरोना काळात शाळा बंद असल्या तरी शाळेत इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून ३० दिवसात ऑनलाईन मराठी वाचन व लेखन उपक्रम राबवला आणि या उपक्रमास पालकांचा भरघोस प्रतिसात मिळाला आहे. या उपक्रमामुळे इयत्ता पहिलीत नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची वाचन व लेखन क्षमता विकसित झाल्याने पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
दरवर्षी २६ जून ला शाळा विदर्भातील शाळा सुरु होतात मात्र या वर्षी कोरोना चा कहर सुरु असल्याने सर्वत्र शाळा बंद आहेत. अशा वेळी रेखा जोरावल यांनी अंगणवाडी ताईच्या मदतीने इयत्ता पहिलीत दाखलपात्र मुलांच्या घरी गृह भेटी देऊन पालकांना शाळेत मुले दाखल करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. इयत्ता पहिलीत एकूण १५ विद्यार्थी दाखल झाली. शाळा बंद असल्याने या नव्याने दाखल झालेल्या मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून प्रशासन अधिकारी जगन मुंढे साहेब व मुख्याध्यापक वामन वाडेकर यांचेशी चर्चा करून विद्यार्थ्यांना किमान मराठी वाचन व लेखन यावे म्हणून ३० दिवसात ऑनलाईन मराठी वाचन व लेखन उपक्रम राबवण्यास सुरुवात केली.
या उपक्रमामध्ये रेखा जोरावल यांनी स्वतःचे घरी शिकवण्याचे व्हीडीओ तयार केले व हे व्हीडीओ पालकांच्या व्हॉटसअप असलेल्या मोबाइल वर पाठवून मुलांच्या अभ्यासासंदर्भात मार्गदर्शन करत पालकांच्या मदतीने मुलांचा अभ्यास पूर्ण केला. मात्र व्हॉटसअप वर पाठवलेल्या व्हीडीओ ची साईज जास्त एम बी ची असल्याने पालकांच्या मोबाइल वर व्हीडीओ डाउनलोड होण्यास जास्त वेळ व इंटरनेट डेटा लागू लागला. याला पर्याय म्हणून रेखा जोरावल यांनी स्वतःचे घरी शिकवण्याचे व्हीडीओ तयार केलेले व्हीडीओ यु टयूब वर अपलोड केले आणि या व्हीडीओ ची लिंक पालकांच्या मोबाइल वर पाठवली सोबतच पालकांना फोनवर मुलांचा अभ्यास कसा करून घ्यायचा या संदर्भात मार्गदर्शन केले आणि एकाच वेळी सर्व पालकांना मुलांचा अभ्यास करून घेणे सोपे झाले.
मराठी मधील स्वर, व्यंजन, स्वरचिन्ह, पंधराखडी, शब्द, शब्दचक्र, वाक्य, जोडशब्द, मराठी वाचनपाठ, गोष्टीचे पुस्तक वाचन इत्यादी वाचन व लेखन सराव या उपक्रमा अंतर्गत व्हीडीओ या उपक्रमात घेतले आहेत. या उपक्रमाशी निगडीत सर्व व्हीडीओ रेखा जोरावल यांच्या मराठी भाषा गुरु या यु ट्यूब चंनल वर अपलोड केलेले आहेत. या उपक्रमात समाविष्ट विद्यार्थी त्यांच्या पालकांच्या मदतीने घरच्या घरी उपक्रमातील व्हीडीओंना पाहत घरचा अभ्यास करु लागले, अभ्यासाचे फोटो पालक रेखा जोरावल यांच्या मोबाईल वर पाठवू लागली आणि लगेच पालकांना अभ्यासातील काही दुरुस्ती असल्यास वेळीच दुरुस्ती सुचवली गेली. यामुळे इयत्ता पहिलीत दाखल झालेले विद्यार्थी चांगल्या प्रकारे मराठी पुस्तकातील वाचन व लेखन करू लागले. कोरोना काळात सुद्धा मुलांना योग्य मार्गदर्शन असले तर मुल शिक्षणापासून वंचित राहत नाहीत हा विश्वास पालकांमध्ये निर्माण झाला.
या उपक्रमासाठी रेखा जोरावल यांना नगर परिषद देऊळगाव राजा च्या मुख्याधिकारी निवेदिता घार्गे, प्रशासन अधिकारी जगन मुंढे, नगरध्यक्षा सुनिता रामदास शिंदे, शिक्षण सभापती नंदाताई संदीप कटारे, मुख्याध्यापक वामन वाडेकर यांचे मार्गदर्शन लाभले. आणि शाळेच्या सर्व पालकांनी उत्तम प्रतिसाद दिला. या उपक्रमात देऊळगाव राजा तालुक्यातील शाळांसह अकोला, यवतमाळ, अहमदनगर, कोल्हापूर, पालघर, नाशिक, जालना, जिल्ह्यातील शाळा सुद्धा मराठी भाषा गुरु या यु ट्यूब चंनल द्वारे सहभागी झाल्या आहेत.