तामगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत एस पी च्या पथकाने तिसर्यांदा केली कारवाई.
अवैध धंद्यांवर आळा घालण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ भूजबळ पाटील यांच्या आदेशान्वये संग्रामपूर तालुक्यात तिसऱ्यांदा कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे स्थानिक पोलिस प्रशासनावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. संग्रामपूर तालुक्यात एकलारा ( बानोदा ) शिवारातील एका शेतात दि. ६ सप्टेंबर रोजी संध्याकाळी ए. पी. आय गजानन वाघ यांच्या नेतृत्वातील पथकाने जुगार अड्ड्यावर धाड टाकली आहे. या धाडीत २५ हजार ८९० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यामध्ये २५ हजार २० रूपये रोख रक्कम तर ८७० रूपांचे इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. पोलिसांकडून प्राप्त माहितीनुसार एकलारा (बानोदा) शिवारातील एका शेतात मोठ्या प्रमाणात जुगार सुरू होते. यासंदर्भात गुप्त माहिती जिल्हा पोलीस अधीक्षकांना मिळाली. त्यांनी पथकाला संग्रामपूर तालुक्यात सुरु असलेल्या एका जुगार अड्ड्यावर धाड टाकण्याचे आदेश दिले होते. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने एकलारा शिवारात धाड टाकली असता शेतामध्ये जुगार खेळत असतांना संतोष गिरी, सचिन राऊत, शेख सादिक, साहेबराव कोकाटे, अशोक बावस्कार, राजेश चोपडे, भागवत अस्वार, संजय बोदडे या ८ आरोपींना अटक केली आहे. यापूर्वीही दोन वेळा तामगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या पथकाने कारवाई करून स्थानिक पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. रविवारी रोजी तिसऱ्यांदा तामगाव पोलिस स्टेशनच्या हद्दीत कारवाई करण्याची आली आहे.
एस पी साहेब जरा सोनाळा पोलीस स्टेशनकडेही लक्ष द्या.
नेहमी कोणत्या ना कोणत्या वादात बहुचर्चेत असलेल्या सोनाळा पोलिस स्टेशनचाच कारभार सद्यस्थितीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाहेर गेला आहे. पोलिस स्टेशनमधील अधिकारी आणि कर्मचाय्रांमध्ये कोणताही समन्वय नाही. त्यामुळे ज्यांनी वाद सोडवायचे, लोकांना न्याय द्यायचा, त्यांचीच अंतर्गत कुरबुर आणि वाद पोलिस स्टेशनच नव्हे जिल्हाभर चव्हाट्यावर येत आहेत. कर्मचाय्रांवर ठाणेदारांचा कोणताही एक अंकुश नसल्याचे निदर्शनास येताच, परिसरातील अवैध धंद्यांनी तसेच गौण खनिज माफीयांनी डोके वर काढल्याचे चित्र आहे. या गंभीर प्रकाराकडे जिल्हा पोलीस अधीक्षकांनी लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे. तामगाव पोलीस स्टेशन प्रमाणेच सोनाळा पोलिस स्टेशनच्या हद्दीत पथकाकडून कारवाई होणे गरजेचे झाले आहे.