अजहर शाह मोताळा प्रतिनिधी
बुलडाणा,दि. 8: समाजाचे वेगवेगळे ऋण प्रत्येकावर असतात. कोविडच्या काळात या ऋणांचे महत्व अधिकतेने पुढे आले. आपण समाजाला काही देणे लागतो. या भावनेतून हे ऋण फेडण्याचा प्रयत्न केला पाहिजे. याच भावनेतून पत्रकारांनी रक्तदान शिबिराचे आयोजन करून या माध्यमातून समाज ऋण फेडण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे, असे प्रतीपादन जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी केले. बुलडाणा टिव्ही जिल्हा टिव्ही जर्नालीस्ट असोसिएशनच्यावतीने जिल्हा पत्रकार भवन येथे रक्तदान शिबिराचे आयोजन केले.
सदर शिबिर उद्घाटन कार्यक्रमाला उद्घाटक पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे उपसिथत होते. कार्यक्रमादरम्यान त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी व्यासपीठावर आमदार संजय गायकवाड, वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष रविकांत तुपकर, बुलडाणा अर्बन सोसायटीचे राधेश्याम चांडक, जिल्हा पोलीस अधिक्षक अरविंद चावरीया, माजी आमदार विजयराज शिंदे, जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष अरूण जैन, टिव्ही जर्नालीस्ट असोसिए शनचे अध्यक्ष वसीम शेख, सचिव युवराज वाघ, संदीप शेळके आदी उपस्थित होते.
पालकमंत्री पुढे म्हणाले, कोविड काळात पत्रकारांनी उत्कृष्ट काम करीत समाजाला जागृत करण्याचे काम केले. त्यामुळे कोरोना विषाणू विरोधात जनजागृती होण्याचे मोलाची मदत झाली. पत्रकारांकडून रक्तदान शिबिरासारखा स्तुत्य उपक्रम आयोजित केलेला आहे. मागील काळात रक्ताचा तुटवडा राज्यात होता . त्यावेळी राज्याचे मुख्यमंत्री ना. उद्धवजी ठाकरे यांनी जनतेला रक्तदान करण्याचे आवाहन केले. अन्न व औषध प्रशासन विभागाच्या माध्यमातून यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्याला प्रतिसाद देत चांगल्या प्रकारे रक्त संकलन राज्यात होत आहे. कोरोना संसर्ग आटोक्यात आणण्यासाठी राज्य शासनाने सातत्याने प्रयत्न केले. त्यामध्ये यशही मिळत आहे.
आमदार संजय गायकवाड यावेळी म्हणाले, कोविड काळात माणुसकीला काळीमा फासणाऱ्या व माणुसकी जिवंत असणाऱ्या घटना सातत्याने अनुभवास आल्या. कोविडने मृत्यू झालेला असल्यास त्याचे प्रेतही नातेवाईक घेत नव्हते. आपलेस आपल्या दूर सारत असल्याचा हृदयद्रावक अनुभव आला. मात्र काहींनी या कठीण काळात माणुसकी जागविणारे काम केले. रक्तदान करून कोविड रूग्णांना आवश्यकतेनुसार रक्तही त्याकाळात पुरविल्या गेले.
रविकांत तुपकर यावेळी म्हणाले, अगदी तुटपुंज्या पगारावर किंवा मानधनावर पत्रकार काम करीत असतात. कोविडच्या परिस्थितीत केवळ पगारासाठी काम न करता व आपले आरोग्य धोक्यात घालून पत्रकारांनी वार्तांकन केले. हे खरेच कौतुकास्पद आहे. केवळ चरितार्थासाठी काम न करणारे पत्रकार हे खरोखरच समाजसेवकच आहेत. राधेश्याम चांडक यावेळी म्हणाले, बुलडाणा अर्बन भविष्यात रूग्णसेवेसाठी चॅरीटेबल हॉस्पीटलची निर्मिती करणार आहे. या माध्यमातून गरीब रूग्णांची सेवा करण्याची संधी संसथेला मिळेल. रक्तदान हे महत्वाचे दान आहे. या दानामुहे लोकांचे जीव वाचतात. असे पवित्र कार्य पत्रकारांनी हाती घेतले ही स्तुत्य बाब आहे.
यावेळी असोसिएशनच्यावतीने नगर परिषद आदर्श उर्दू शाळेचे मुख्याध्यापक रयसोद्दीन काजी, संचेती हृदयालयाचे डॉ. संचेती, पत्रकार गजानन धांडे यांचा मान्यवरांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक सचिव युवराज वाघ यांनी केले. प्रास्ताविकात कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विषद केली. असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष वसीम शेख यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन संदीप वानखेडे यांनी केले. कार्यक्रमाला जिल्हा पत्रकार संघाचे पदाधिकारी, टि व्ही जर्नालिस्ट असोसिएशनचे पदाधिकारी, राजकीय, सामाजिक क्षेत्रातील व्यक्ती, पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
**********