अजहर शाह मोताळा
बुलडाणा:-दि. 28 : केंद्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाद्वारे समाजात महिला सशक्तीकरण, समाज व राष्ट्र निर्माण करण्याचे कामात उत्कृष्ट योगदान देणारी व्यक्ती , संस्था यांना दरवर्षी नारी शक्ती राष्ट्रीय पुरस्कार देण्यात येतो. जागतिक महिला दिनी 8 मार्च रोजी सदर पुरस्काराचे वितरण करण्यात येते. या पुरस्काराकरीता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे.
या पुरस्कासाठी दि. 1 जुलै 2020 रोजी ज्या व्यक्तींचे वय किमान 25 वर्ष पुर्ण केलेले आहे आणि ज्यांना यापुर्वी नारी शक्ती पुरस्कार, स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही. तसेच ज्या संस्था, गट, संघटना यांनी किमान 5 वर्षे संबंधीत क्षेत्रात काम केलेले आहे आणि ज्यांना यापुर्वी नारी शक्ती पुरस्कार , स्त्री शक्ती पुरस्कार मिळालेला नाही, असे व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना हे नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र आहेत.
कौशल्य विकासासाठी महिलांना प्रोत्साहित करणे, ग्रामीण महिलांसाठी मुलभुत सुविधा सुकर करणे, विज्ञान व तंत्रज्ञान, क्रिडा, कला, संस्कृती आदी क्षेत्रांमध्ये ठोसपणे व सार्थपणे बचाव व सुरक्षा, आरोय, शिक्षण, कौशल्य विकास, जीवन कौशल्य महिला सक्षमीकरणाचा व्यक्ती किंवा संस्था, गट, संघटना यांना अनुभव असावा. राज्य अथवा केंद्रशासी प्रदेशात बाल लैंगिक गुणोत्तर अचुकपणे सुधारणा करण्याचे काम करणाऱ्यांचा या पुरस्कारासाठी प्रथम प्राधान्याने विचार करण्यात येणार आहे.
अर्जदाराने नारी शक्ती पुरस्कारासाठी अर्ज, नामनिर्देशन केवळ ऑनलाईनव्दारे केंद्र शासनाचे www.narishakti puraskar.wcd.gov.in या वेबसाईटवर भरायचे आहेत. सदर वेबसाईटची लिंक महिला व बाल विकास मंत्रालयाच्या www.wcd.nic.in या कार्यालयीन वेबसाईटवर देखील उपलब्ध आहे. ऑनलाईन अर्जात नमुद केलेल्या कागदपत्रांसह नामांकने सादर करावे. नामांकने सादर करावयाची अंतिम तारीख ही 30 जानेवारी 2021 आहे. नारी शक्ती पुरस्कारासाठी पात्र इच्छुक व्यक्ती किंवा संस्था / गट / संघटना यांना उपरोक्त वेबसाईटवर ऑनलाईन पध्दतीने प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अरविंद रामरामे यांनी केले आहे.