वर्धा, दि 2 ऑगस्ट :- पूर परिस्थिती निर्माण होत असताना ग्रामपंचायतीची भूमिका महत्त्वाची असते. अतिवृष्टीमुळे नदीची पातळी वाढून नदीकाढच्या गावात धोका निर्माण होत असल्यास त्याची तात्काळ माहिती ग्रामपंचायत ने तहसील व जिल्हा नियंत्रण कक्षाला कळवावी. तसेच धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी 24 तास आधी नदीकाढच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी दिल्यात.
जिल्ह्यात पूर परिस्थितीचे नियोजन करण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी सर्व तालुक्याचा आढावा घेतला. दुरदृश्य प्रणालीद्वारे घेतलेल्या या आढाव्यात निवासी उपजिल्हाधिकारी अर्चना मोरे, उपजिल्हाधिकारी नितीन पाटील, उपविभागीय अधिकारी सुरेश बगळे, हरीश धार्मिक, चंद्रभान खंडाईत, तहसीलदार व इतर अधिकारी उपस्थित होते. आंतरराज्य नद्यांचा परिणाम भंडारा, नागपूर, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्याला मोठ्या प्रमाणात होतो. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी इतर राज्यातील प्रशासनासोबत बैठक घेऊन धरणाचे पाणी सोडण्यापूर्वी 24 तास अगोदर पूर्व कल्पना देण्यास सांगितले आहे. आपल्या जिल्ह्यातही धरणाचे पाणी सोडताना 24 तास अगोदर नदी काढच्या गावांना पूर्व कल्पना द्यावी, जेणेकरून अनुचित घटना टाळता येतील. धरण प्रकल्प निहाय ग्रामपंचायतीचे गट बनवावेत, म्हणजे एखाद्या धरणातून पाणी सोडण्यापूर्वी नेमक्या ग्रामपंचायतीला त्याची माहिती तात्काळ देणे शक्य होईल. तहसीलदार, आणि गट विकास अधिकारी यांनी सर्व ग्रामपंचायतींच्या सरपंच, सचिवांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करावे.
आपल्या जिल्ह्यात झालेल्या तिन्ही घटना ह्या पुलावर पाणी असताना पूल ओलांडताना वाहून गेल्याच्या घटना आहेत. त्यामुळे पुलावर पाणी असताना, नाल्याला पूर आलेला असताना रस्ता ओलांडू नये अशा प्रकारे जनजागृती नागरिकांमध्ये करणे आवश्यक आहे. अगदी क्षुल्लक कारणामुळे एकाही व्यक्तीचा मृत्यू होता कामा नये याची काळजी घेण्याच्या सूचनाही त्यांनी यावेळी दिल्यात.
वर्धा – आर्वी, आर्वी- तळेगाव तसेच वर्धा – समुद्रपूर या रस्त्यावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विशेष काळजी घ्यावी. या रस्त्यावर सुरक्षेचे उपाय म्हणून उत्तम बॅरिकेट्स, वळण रस्ता धावणारे फलक,आणि परावर्तक लावण्यात यावेत. तसेच रस्त्यावर खड्डे असल्यास ते बुजवावेत. निम्न वर्धा प्रकल्पाचे पाण्यामुळे काही गावातील शेत आणि घरात पाणी घुसते त्यामुळे याबाबत पुनर्वसनाचा किंवा त्यांना मोबदला देण्याचा प्रस्ताव जलसंपदा विभागाने सादर करावा, याबाबत विशेष काळजी घ्यावी अशा सुचनाही जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.
सूर्या मराठी न्यूज साठी सचिन वाघे