गोंदिया-शैलेश राजनकर
तिरोडा,दि.१६ : धापेवाडा गट ग्रामपंचायतच्या निवडणुकीत पोलीस बंदोबस्तात कर्तव्यावर असलेले दवनीवाडा पोलीस ठाण्याचे नायक पोलीस शिपाई रूपचंद झनकलाल ढोमने (वय 57) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना शुक्रवार, 15 जानेवारी रोजी सायंकाळी 5.15 वाजता घडली. ते मूळचे मुशानी (नवेगाव) येथील रहिवासी होते.
धापेवाडा गट ग्रामपंचायतीची निवडणूक शांततेत व सुरळीतपणे पार पडावी, निवडणुकीदरम्यान गावात सुव्यवस्था कायम राहावी, या हेतूने नापोशि ढोमने यांची ड्यूटी धापेवाडा गेटवर लावण्यात आली होती. आपले कर्तव्य जबाबदारीने पार पाडत असताना मतदान प्रक्रिया संपण्यास अर्धा तास बाकी असताना त्यांची प्रकृती अचानक खालावली. लगेच स्थानिक डॉक्टरकडून त्यांची तपासणी करण्यात आली. त्यांनी गोंदियाला नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे उपचारासाठी त्यांना गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात नेण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.
नापोशि ढोमने हे माजी सैनिक होते. जूनअखेर त्यांची सेवासमाप्ती होती. त्यांच्या अचानक निधनामुळे दवनीवाडा पोलीस ठाण्यात शोकाकुल वातावरण निर्माण झाले आहे.