बुलढाणा: वादळी वारे व गारपीट सह झालेल्या अवकाळी पावसाने तब्बल १० एकरावर पेरलेल्या हरभरा पिकाला उद्धवस्त केले. डोळ्यादेखत पिकाचा चिखल अन हिरव्या स्वप्नांचा चुराडा झाल्याने अखेर हतबल शेतकऱ्याने पिकावर रोटावेटर फिरविला आहे.
बुलढाणा तालुक्यातील चिखला येथे आज रविवारी संध्याकाळी हा धक्कादायक घटनाक्रम घडला.
जमिनीतील पिकावर नव्हे तर आमच्या हृदयावरच ट्रॅक्टर फिरल्याची भावना झाल्याचे हरिदास खांडेभराड या शेतकऱ्याने मोबाईल वरून बोलताना सांगितले.
शेतकऱ्यांवरील संकट कमी होण्याऐवजी उलट वाढतांना दिसत आहे. अस्मानी सह सुलतानीने शेतकरी पुरता हताश होताना दिसत आहे. अशातच खरीप पिक हातातून निघून गेल्यानंतर आता अवकाळी पाऊस आणि वातावरणात झालेल्या बदलामुळे रब्बी पिकावर देखील विविध रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे हरिदास भाऊंनी हे टोकाचे पाऊल उचलले. त्यांनी आपल्या दहा एकर हरभरा पिकावर रोटावेटर फिरवला आहे.
हरिदास खांडेभराड यांच्याकडे १४ एकर जमीन आहे. त्यांनी खरीपामध्ये सोयाबीनची पेरणी केली होती. मात्र उत्पन्नात मोठी घट झाल्याने त्यांचा जेमतेम खर्च निघाला. त्यांना आता रब्बी पिकांवर मोठी आशा होते त्यामुळे त्यांनी आपल्या दहा एकर शेतात जास्त उत्पन्न देणाऱ्या डॉलर जातीच्या हरभरा पिकाची लागवड केली. त्याला जवळपास पावणेदोन लाख रुपये खर्च आला.
https://www.suryamarathinews.com/bjpnews/
मात्र अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणामुळे पिकावर बुरशी दह्या रोग आणि अळीचा प्रादुर्भाव झाल्याने त्यांचे उभे पीक जळत आहे. त्यामुळे छातीवर दगड ठेवून या संपूर्ण दहा एकरातील हरभरा पिकात रोटावेटर घालून पीक उध्वस्त केले आहे. खांडेभराड यांच्यावर विदर्भ क्षेत्रीय ग्रामीण बँकेचे साडेतीन लाख रुपये व खाजगी पतसंस्थेचे दोन लाख रुपयांचे कर्ज आहे. रब्बीमधील पावणेदोन लाख रुपयांचा खर्च पाण्यात गेला आहे. त्यामुळे आता बँकेचे कर्ज कसे फेडायचे असा यक्ष प्रश्न त्यांना पडला आहे. शासनाने भरीव मदत करण्याची मागणी त्यांनी केली आहे…
farmer