जिल्हा उपनिबंधकाचा आदेशाने शेगाव बाजार समिती बरखास्त ! सहकार क्षेत्रात खळबळ

 

आयुषी दुबे शेगाव

शेगाव (सूर्या मराठी न्यूज) ः शेगाव बाजार समितीवरील संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. सभापती श्रीधर उन्हाळे यांच्यासह 11 संचालकांना जिल्हा उपनिबंधकांनी अपात्र घोषित केले आहे. या कारवाईने सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे. याबाबद सविस्तर वृत्त असे की जिल्हा बँक अवसायनात निघाल्यानंतर ती सुरळीत करण्यासाठी काही उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यात कर्जवसुलीसाठी मोहीम आखणे, कर्मचारी कपात, स्वेच्छानिवृत्ती योजना, सेवासंस्थांचे एकत्रिकरण आदी उपाययोजना करण्यात आल्या. तालुक्यात 32 सेवा संस्था होत्या. त्या एकत्रित करून 7 वर आणल्या गेल्या. त्यामुळे अनेक सदस्य कमी झाले. परिणामी या सेवा संस्थांमधून निवडून आलेले अनेक प्रतिनिधी अपात्र ठरले. दोन दिवसांपूर्वीच्या आदेशातील तांत्रिक प्रक्रियेमुळे शेगाव बाजार समितीचे 11 संचालकही अपात्र ठरले असून, यात सभापती श्रीधर उन्हाळे, पांडुरंग पाटील, शेषराव पहुरकर, पुंडलिक भिवटे, रामरतन पुंडकर, सौ. पंचफुलाबाई जवंजाळ, सौ. नंदाबाई उमाळे, विठ्ठल भांबेरे, आत्माराम महाले, देवेंद्र हेलगे, सौ. अनुपमा मिरगे अशा 11 संचालकांचा समावेश आहे. या संचालकांना अपात्र ठरविण्यासाठी पांडुरंग शेजोळे व शेख नजीर शेख खालिक यांनी तक्रार केली होती. त्यावर जिल्हा उपनिबंधक आर. एल. राठोड यांनी कारवाई केली आहे. सदर कारवाई मुळे सहकार क्षेत्रात खळबळ उडाली आहे.

Leave a Comment