गजानन सोनटक्के
जळगाव जामोद
परतीच्या पावसामुळे सोयाबीन व कपाशी पिकाचे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक गर्तेत अडकला असून, त्याला मदत करून तातडीने दिलासा द्यावा, अशी मागणी सुनगाव येथील शेतकर्यांनी उपविभागीय अधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात शेतकर्यांनी म्हटले आहे, की यावर्षी सुरुवातीपासून सर्व पिकांवर किडीचे (रोगराई) प्रमाण असल्यामुळे पिकांवर जास्त प्रमाणात औषधीसाठी खर्च करावा लागला. नंतर संततधार पावसामुळे मूग, उडीद पिकाचे पूर्णतः नुकसान झाले असताना आता परतीच्या पावसामुळे हाती आलेले सोयाबीन पिक अक्षरशः जागेवरच सडल्यामुळे त्यापासून कोणत्याही प्रकारचे उत्पन्न मिळाले नाही. उलट त्यासाठी भरपूर प्रमाणात खर्च करावा लागला. आजरोजी सतत आठ दिवसापासून रोज पाऊस सुरू असून कपाशी पिकाचे गोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. अशा परिस्थितीत शेतकरी वर्गाने केलेला खर्च सुध्दा निघत नसून तो दुहेरी संकटात सापडलेला आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन शेतकर्यांना आर्थिक मदत आणि पिक विमाची 100 टक्के रक्कम द्यावी. विमा कंपनीला तसे निर्देश आणि आणेवारी कमी दाखवून शेतकरी वर्गाला आर्थिक संकटातून बाहेर काढावे. मागण्या मार्गी न लागल्यास लागल्यास पर्यायी आम्हाला लोकशाही मार्गाचा अवलंब करावा लागेल व होणार्या परिणामास आपण व विमा कंपनी जबाबदार राहील, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदनाच्या प्रती जिल्हाधिकारी, तालुका कृषी अधिकारी, तहसीलदारांना देण्यात आल्या आहेत. निवेदनाला पंचायत समिती उपसभापती महादेवराव धुर्डे, जिल्हा परिषद सदस्या सौ. रुपालीताई अशोक काळपांडे यांनी पाठिंबा दिला. निवेदनावर मोहनसिंह राजपूत, गजानन सोनटक्के, गणेश भड, प्रविण धर्मे, संजय निमकर्डे, विजय वंडाले, प्रवीण कापरे, गणेश अंबडकार, समाधान भगत, तुकाराम भगत, मारोती अंबडकार, बळीराम वसुले, तुकाराम मिसाळ, गजानन धुळे, प्रवीण येउल, मारोती मिसाळ, नितीन भड आदींसह शेकडो शेतकर्यांच्या सह्या आहेत.