उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील एका मुलीवर सामुहिक बलात्कार करण्याची अमानवीय घटना घडली. पंधरा दिवस दवाखान्यामध्ये मृत्यूशी झुंज देत पिडीत मुलीने शेवटी आपली जीवन यात्रा संपवली. यादरम्यान पोलिस प्रशासन तसेच उत्तरप्रदेश सरकारकडून पिडीतेला न्याय देण्यासाठी आरोपींवर कुठल्याही प्रकारची कारवाई करण्यात आलेली नाही. याउलट आरोपींना शोधून त्यांना जेरबंद करण्याऐवजी स्थानिक प्रशासनाकडून पिडीत मुलीच्या कुटुंबावर दबाव टाकण्यात आला आणि काल मध्यरात्री त्या मुलीवर कुटुंबियांना विश्वासात न घेता अंत्यसंस्कार करण्यात आल्याची अजून एक निंदनिय घटना समोर आली आहे. या अत्यंत दुर्दैवी घटनेचा सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी तथा सदस्य,जिल्हा परिषद ॲड.जयश्रीताई शेळके यांच्यावतीने निषेध नोंदविण्यात आला.
देशभरामध्ये महिलांवर तसेच लहान मुलींवर अत्याचार होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. मग यामध्ये दिल्लीतील निर्भया, तसेच कोपर्डी, कठुआ, उन्नाव, हैद्राबाद, हिंगणघाट आणि आता उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील घटनेची दुर्दैवी भर पडली. 2018 च्या आकडेवारीनुसार भारतामध्ये दररोज 150 पेक्षा जास्त बलात्कार होतात. देशभरात महिलांवरील अशा अत्याचाराच्या घटना वारंवार घडत असताना आरोपींच्या शिक्षेस होणारा विलंब हि अतिशय गंभीर बाब आहे. त्यामुळेच असे कृत्य करण्याऱ्या विकृत मनोवृत्तीच्या लोकांना कायद्याची भिती वाटत नसावी. परंतु या घटनेमुळे जनसामान्यांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात असंतोषाचे वातावरण आहे. मात्र वेळोवेळी फक्त निषेध नोंदवून किंवा ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’ यांसरख्या पोकळ घोषणा देवून ह्या घटना थांबणार नाहीत. महिला सुरक्षेच्या प्रश्नांवर सुस्त पडणे आणि बलात्कारासारख्या घटना घडल्यानंतर कायम झोपेचं सोंग घेणे बंद व्हायला हवे. हाथरस येथील घटनेमध्ये आरोपींनी पिडीतेसोबत केलेले कृत्य हे क्रौर्याचा कळस गाठणारे आहे. पिडीतेच्या मृत्युनंतर तिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन न करता तसेच कुटुंबियांना न कळवता मध्यरात्री तिचा मृतदेह जाळून टाकणे हे अमानवीय आहे.
भविष्यात अशा प्रकारचे अमानवीय, हिंसक, आणि लाजिरवाणे कृत्य करण्याची कुणाची हिंमत होता कामा नये, यासाठी उत्तरप्रदेशमधील हाथरस येथील मुलीवर झालेल्या अत्याचाराचा गांभिर्याने विचार करुन मानवतेला काळीमा फासणारे कृत्य करणाऱ्या नराधमांना फाशीचीच शिक्षा द्यावी अशी मागणी सरचिटणीस, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस कमिटी तथा सदस्य,जिल्हा परिषद ॲड.जयश्रीताई शेळके यांनी मा. केंद्रीय गृहमंत्री यांच्याकडे मा.जिल्हाधिकारी तसेच मा.जिल्हा पोलिस अधिक्षक यांच्या मार्फत निवेदन देवुन केली.
यावेळी निवेदन देतांना सौ.नंदीनी टारपे, सौ.अर्चना राजेंद्र शेळके, सौ.अर्चना अरुण शेळके, सौ.अनिता गजानन गायकवाड, सौ.अलका विष्णू धंदर, सौ.वर्षा दिलीप खरात, सौ.भारती देवानंद ताठे, सौ.लता गणेश बाहेकर, सौ.सुनिता संदीप सावळे, सौ.स्मिता किरण वराडे, सौ.सोनाली अनिल वाघ, सौ.दिपाली सतिष राजपूत, सौ.मिनाक्षी संजय देशमुख, स्वाती मधुकर साबळे, उषा समाधान डोंगरे, सौ.रंजना गजानन कुसळकर, पुजा घाडगे, संगीता सोनुने, शितल सावळे यांच्यासह अनेक महिला उपस्थित होत्या.