Wardha सचिन वाघे प्रतिनिधी
हिंगणघाट, दि. 3 डिसेंबर
कडाजना शिवारातील मानधनीया दालमिल मध्ये काम सुरू असताना डाळीच्या हौदात एका बालकामगाराचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
मृत्यूनंतर दालमिल मालकाने घटनेची पोलिसांना सूचना न देताच बाल कामगार प्रभास कुमार यादव वय 16 वर्ष याचा मृतदेह त्याच दाल मिल मध्ये कामकरणाऱ्या भावाचे मदतीने हिंगणघाट येथिल स्मशानभूमीत जाळण्यात आला.
सदर घटना 30 नोव्हेंबर बुधवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली आहे. त्याचे दिल्ली येथिल आते भावाने पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार केल्यावर या प्रकरणी पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले असून कंपनीचा संचालक सौरभ मानधनीया फरार झाला आहे.
कंपनी ही मानधनिया परिवारातील एका महिलेच्या नावावर असून मुलगा सौरभ हा कंपनीचे कामकाज सांभाळतो. मृतक प्रभासकुमार यादव हा बिहार राज्यातील अमृतनगर (दरभंगा) येथील १६ वर्षीय अल्पवयीन बाल कामगार आहे. हिंगणघाट येथे मानधनीया दाल मिल मध्ये कार्यरत होता.
गेल्या काही महिन्यांपासून कामकरणाऱ्या या कामगाराने नेहमीप्रमाणे आपले काम बुधवारी सुरू केले. रात्री ९ वाजताच्या सुमारास मानधनीया दालमील मधील डाळीच्या हौदात उतरला. याच हौदातील डाळ बाहेर निघणाऱ्या आऊटलेटमध्ये तो अडकला. तर याच हौदात वरून पडणारी डाळ त्याच्या अंगावर पडत राहिली. यात त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेने हादरलेल्या दालमिल मालकाने मात्र त्याच्या परगावी असणाऱ्या नातेवाईकाला पूर्व सूचना दिली नाही, पोलिसांना देखील
याबाबत माहिती दिली गेली नाही.कंत्राटदार व कामगारांच्या मदतीने त्याचे कामगार असलेल्या भावावरती दबाव आणून मृतक प्रभासचा मृतदेह जाळण्यात आला.
सर्वकाही संपल्यानंतर त्याच्या भावाने घटनेची माहिती परप्रांतातील कुटुंबियांना दिली. नंतर दिल्ली येथील नातेवाईकाने पोलिसात तक्रार करताच घडलेले सर्वप्रकरण समोर आले आहे.
या प्रकरणाने सर्वत्र खळबळ निर्माण झाली असून बालकामगार हा विषय हाताळणाऱ्या कामगार अधिकारी कार्यालयावर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
हिंगणघाट पोलिसांनी या प्रकरणात गुन्हे नोंद केले असून आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यामध्ये कंत्राटदार अजितकुमार यादव, कामगार अशोक ऊरिया, सुपरवायझर दिलीप असलकर यांचा समावेश आहे. तर या कंपनीचा मालक तसेच कंपनी मॅनेजर मात्र फरार झाला आहे.
Wardha News