आळंदी : सतरा दिवसांच्या मुक्कामानंतर तीर्थक्षेत्र आळंदी मधून संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चल पादुका आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आलेल्या शिवशाही बस मधून आज सकाळी नऊ वाजून तीस मिनिटाने पंढरपूर कडे हरीनामाच्या गजरात मार्गस्थ झाल्या. सोमवारी पहाटे नित्य पुजा व आरती पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील यांच्या हस्ते करण्यात आली, साडे सहा ते साडे आठ धोंडोपंत दादा अत्रे फडाची कीर्तन पाडुन माऊलींचे आषाढी एकादशीच्या निमित्ताने 40 वारकर्यांच्या उपस्थित दोन शिवशाही बस मधुन पंढरपूर कडे प्रस्थान झाले.
2 जुलैला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या चल पादुकांनी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवले होते. मात्र करोनामुळे शासनाच्या निर्देशानुसार सतरा दिवस माऊलींच्या पादुकांचा मुक्काम आळंदीत आजोळघरी होता. यावेळी वारीच्या वाटेवर जे काही परंपरेनुसार रिंगण सोहळा सोडून बाकीचे कार्यक्रम असतात ते सर्व माऊलींच्या मंदिरात प्रतिनिधीक स्वरूपात पार पडले.
शिवशाही बसमधून माऊलींसोबत चाळीस वारकरी जाणार आहेत. त्यामध्ये संस्थानचे मुख्य विश्वस्त डॉ. अभय टिळक, पालखी सोहळा प्रमुख विकास ढगे पाटील, विश्वस्त लक्ष्मीकांत देशमुख, विश्वस्त योगेश देसाई यांच्या सहीत माऊलींचे मानकरी, सेवक, वारकरी यांचा समावेश आहे.
पंढरपूर तालुक्यात दुपारी 2 वाजता वाखरी येथे पोचतील, तेथे इतरही मनाच्या पालख्या बसमधून येणार आहेत. तेथे सर्व संतांची भेट होऊन पुन्हा पंढरीत पादुका विसावतील. त्यानंतर 24 जुलैला पौर्णिमेला काला करून पादुका आळंदीकडे मार्गस्थ होतील.