‎विवेकानंद आश्रमाचा वटवृक्ष सर्वघटकांच्या उन्नतीचा – राज्याचे मा. मुख्य सचिव श्री. जे.पी. डांगे साहेब

 

(दि.26 फेब्रुवारी 2021) विवेकानंद आश्रम ही प.पू.शुकदास महाराजांनी बिजारोपण केलेल्या सेवेचा वटवृक्ष असून हा वटवृक्ष समाजाच्या सर्व घटकांचे प्रतिनिधीत्व करतो. संस्थेव्दारा सुरू असलेल्या कार्याचे अवलोकन केले असता समाजातील सर्व घटकांच्या उन्नतीचे व न्याय देण्याचे कार्य या ठिकाणी सुरू असल्याचे उदगार महाराष्ट्राचे माजी मुख्य सचिव व राज्याच्या प्रवेश नियामक मंडळाचे अध्यक्ष जे.पी. डांगे यांनी विवेकानंद आश्रमाच्या कृषि महाविद्यालय व कृषि व्यवसाय व्यवस्थापन महाविद्यालयाच्या भेटी प्रसंगी काढले.
महाविद्यालयात आगमन होताच प्राचार्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. विविध विषयांच्या प्रयोगशाळा, ग्रंथालय व विद्यार्थी प्रवेशांसंबंधीची सर्व माहिती त्यांनी जाणून घेतली. महाविद्यालयाकडून दिले जाणारे दर्जेदार शिक्षण व कौशल्यप्राप्त विद्यार्थी निर्माण होण्यासाठी केले जात असलेले प्रयत्न अधिक गतीने सुरू ठेवण्याची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. आश्रमाच्या हरिहरतीर्थावरील गोशाळा, गांडुळखत निर्मिती प्रकल्प, शिवउद्यान तसेच कोराडी जलाशयातील विवेकानंद स्मारकाला सुध्दा त्यांनी भेट दिली. ग्रामीण भागातून येणाऱ्या विद्यार्थ्याला शहरीभागात व विद्यापीठ स्तरावर दिल्या जाणाऱ्या शिक्षणाच्या सर्व सोयी प्रत्येक महाविद्यालयाने आपल्या पातळीवर दिल्यास जास्तीत जास्त विद्यार्थी स्पर्धेत टिकू शकतील अशी अपेक्षाही त्यांनी यावेळी व्यक्त केली. संस्थेव्दारे निर्माण केलेले मुलींचे वसतिगृह ही दुर्गम भागातील व गरीब कुटुंबातील मुलींसाठी मिळालेली मोठी संधी आहे. मुलींच्या शिक्षणासाठी महापुरूषांनी अतोनात प्रयत्न केलेत. आजही ग्रामीण भागातील मुलींना केवळ सोय नसल्यामुळे शिक्षणापासून वंचीत राहावे लागत आहे. मुलींच्या शिक्षणासाठी सर्वदूर प्रयत्न व्हावेत असेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. विवेकानंद आश्रमासारख्या धर्मदाय संस्था या प्रकारच्या शिक्षणविषयक सुविधा निर्माण करून मुलींना न्याय देण्याचे काम करीत आहेत. यावेळी त्यांनी प.पू.महाराजश्रींसोबतच्या जुन्या आठवणींनाही उजाळा दिला.
याप्रसंगी विवेकानंद आश्रमाचे अध्यक्ष आर.बी.मालपाणी, उपाध्यक्ष अशोक थोरहाते, सचिव संतोष गोरे, सहसचिव आत्मानंद थोरहाते, सेवानिवृत्त कमिशनर बी.बी.धांडे, विश्‍वस्त दादासाहेब मानघाले, पुरूषोत्तम आकोटकर, प्राचार्य डॉ.सुभाष कालवे, प्राचार्य डॉ.सुधाकर चांगाडे तसेच दोन्ही महाविद्यालयाचे सर्व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Comment