सिंदखेड राजा (सचिन खंडारे )
करोना प्रादुर्भावामुळे समाजामध्ये भीतीचे, भयाचे वातावरण आहे. आजूबाजूला सतत ज्या घटना घडत आहेत, त्यामुळे लोक घाबरतात. ज्यांच्या कुटुंबापर्यंत करोना पोहोचला आहे, ती कुटुंबे त्याहीपेक्षा जास्त घाबरलेली आहेत. भयभीत अशी स्थिती दुर्दैवाने निर्माण झाली आहे. करोनाने एकूण समाजव्यवस्था आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीयदृष्टय़ा उद्ध्वस्त केली आहेच, पण मानसिकता आणि मानवी भावपटलावरही त्याचे ओरखडे उठले आहेत. हे भय, चिंता या साऱ्यातून समाजाला मानसिकदृष्टय़ा बाहेर काढणे हेसुद्धा एक आव्हान आहे. एकीकडे न दिसणाऱ्या विषाणूच्या विरोधात लढाई लढायची आहे, तर दुसरीकडे या भयगंडातून, नैराश्यातून थिजलेल्या समाजव्यवस्थेच्या चक्रालाही गतिमान करण्याचे आव्हान आहे. या सगळ्या लढाईमध्ये विज्ञान, वैज्ञानिक साधने, औषधे हे जसे उपयोगी ठरत आहेत, ठरणार आहेत; त्यासोबतच धार्मिक परंपरा, विधी, सण-उत्सव आणि त्यातून निर्माण होणारी सकारात्मक ऊर्जा हीसुद्धा समाजाला नैराश्यातून बाहेर काढू शकते, भयमुक्त करू शकते. म्हणून उत्सवप्रिय समाजाला नियमांचे पालन करून हळूहळू त्या दिशेने घेऊन जाणे गरजेचे आहे. काही अंशी हे काम आपण करीत आहोत आणि म्हणूनच अखंड परंपरा असणारी वैष्णवांची वारी जरी या वर्षी होऊ शकली नाही, तरी वारकरी परंपरेला खंड न पडू देता संतांच्या पादुका पंढरपुरात गेल्या. शिस्तबद्ध पद्धतीने विठ्ठलाचा आषाढीचा सोहळा संपन्न झाला. यातून निर्माण झालेली सकारात्मक ऊर्जा ही वारकरी समाजाला चेतना देणारीच ठरेल, तशी ऊर्जा निर्माण करणे ही आता गणेशोत्सव मंडळांचीसुद्धा जबाबदारी होऊन बसली आहे. याचेच औचित्य साधून सालाबादाप्रमाणे मौजे सवडद येथे श्री सिद्धिविनायक मंदिरावर तिन दिवसीय गणेश जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे.
सोशल डिस्टसिंगचा वापर करून दि 13 पासून ह्या कार्यक्रमाला प्रारंभ होणार असून पहिल्या दिवशी सकाळी 9 ते 12 डॉ. ज्ञानेश्वर तांगडे बालरुग्णायल साखरखेर्डा हे मोफत बालरोग तपासणी तथा मोफत औषधोपचार करणार आहेत. सायंकाळी 8 ते 10वा गणेश घुले औरंगाबाद यांचा विद्यार्थ्यांना उर्जा देणारा “सुंदर माझी शाळा” जागर बालकवितेचा हा कार्यक्रम संपन्न होणार आहे दि 14 फेब्रुवारी रोजी रात्रौ 8 ते 10 राष्ट्रीय किर्तनकार सप्त खंजेरी वादक संदिपाल महाराज यांचा कार्यक्रम तर दि 15 फेब्रुवारी रोजी सकाळी अकरा वाजता बालकिर्तनकार सोहम महाराज काकडे यांचे काल्याचे किर्तन नंतर किशोर महाजन, ओमप्रकाश अग्रवाल, डॉ शेषराव देशमुख यांच्या हस्ते महाप्रसाद वाटप रात्रौ 8 ते 10 गुरूदेव सेवा मंडळ वझर खामगाव यांच्या कार्यक्रमाने सांगता होईल. दरम्यान तिन्ही दिवस सकाळी 11 ते 5 ह. भ.प.अशोक महाराज घायाळ यांच्या अमृवाणीतून गणेश पुराण कथासार संपन्न होणार आहे. यामध्ये हरिपाठ, भजन असे वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात आले असल्याने भाविकांनी या कार्यक्रमाला मोठय़ा संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.