सचिन पगारे
नांदगाव (नाशिक)
सोमवारी पाडव्याच्या मुहूर्तावर नांदगाव तालुक्यातील जातेगांव येथील श्री पिनाकेश्वर( मोठा महादेव ) देवस्थानचे अतिप्राचीन शिवमंदिर हे शासन आदेशावरून शिवभक्तांसाठी उघडण्यात आले. यामुळे शिवभक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार झाले आहे. मंदीर प्रवेश करताना शासनाने जाहीर केलेल्या विविध नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, असे आवाहन देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर चव्हाण यांनी केले.
शासनाने पाडव्याच्या मुहूर्तावर सर्व प्रार्थनास्थळे उघडण्याचा निर्णय घेतल्यामुळे नांदगांव तालुक्यातील जातेगांवच्या उत्तरेला सातमाळा पर्वतरांगेत असलेले श्री क्षेत्र पिनाकेश्वर महादेव (मोठा महादेव) हे अतिप्राचीन देवस्थान शिवभक्तांसाठी उघडण्यात आले. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर गेल्या आठ महिन्यांपासून देवस्थान ट्रस्ट मार्फत हे मंदिर बंद ठेवून व भक्तांना प्रवेश बंद करुन अतिदक्षता घेण्यात आली होती .सोमवारी श्री पिनाकेश्वर महादेव मंदिराचा मुख्य दरवाजा व गर्भगृह दरवाजा मंदीर ट्रस्ट समितीने उघडून संपूर्ण मंदिर परिसरात निर्जंतुकिकरण केले त्यामुळे शिवभक्तांमध्ये समाधानाचे चे वातावरण तयार झाले आहे. शिवभक्तांनी मंदिर प्रवेश करताना हर हर महादेवाचा जयघोष करत आनंद व्यक्त केला . मात्र मंदीर प्रवेश करताना विविध नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बाबत श्री पिनाकेश्वर महादेव मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर चव्हाण यांनी सांगितले की, शासन आदेशान्वये हे मंदिर जनतेसाठी खुले करण्यात आले असले तरी विविध नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. मंदीर प्रवेश करताना मास्कचा वापर करणे, सामाजिक अंतर ठेवणे , मंदिर परिसर, सभामंडप ,गर्भगृहात मूर्तींना स्पर्श न करणे , प्रसाद वाटप न करणे आदी नियमांचे पालन भक्तांनी करणे आवश्यक आहे.अशा विविध नियमांचे पालन करुन सहकार्य करण्याचे आवाहन मंदीर ट्रस्ट मार्फत करण्यात आले आहे. यावेळी पिनाकेश्वर देवस्थानचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर चव्हाण, सुरक्षारक्षक आकाश खिरडकर, संतोष खिरडकर , ग्रामस्थ आदी उपस्थित होते .