रविकांत तुपकरांचा आत्मक्लेश : रविकांत तुपकरांसह कार्यकर्त्यांनी नुकसान भरपाईसाठी घेतले गाडून..

 

 

पॉझिटीव्ह रिपोर्ट’च्या ग्वाहीनंतर आंदोलन मागे; आंदोलनकर्त्यांची बिघडली तब्येत !
अन् राणा चंदन यांनी घेतले अंगावर पेट्रोल

मोताळा : गत काही दिवसांपासून सुरू असलेल्या सततच्या पावसामुळे शेतपिकांच्या झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन हेक्टरी २५ हजारांची मदत देण्याच्या मागणीसाठी टोकाचे पाऊल उचलत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्यासह 3 कार्यकर्त्यांनी एका नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या शेतात स्वतःला गाडून घेण्याचे अनोखे आंदोलन परडा ता.मोताळा शिवारात केल्यांनतर प्रशासनात एकच खळबळ उडाली. साडेतीन तास आंदोलनकर्ते जमिनीत राहल्याने त्यांची तब्येत खालावली असून तिघांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. तर तुपकर यांचीही ‘ऑक्सिजन लेवल’ कमी झाली होती. दरम्यान येत्या तीन दिवसांत नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे पूर्ण करुन मदतीसाठी ‘पॉझिटीव्ह रिपोर्ट’ पाठविण्याची ग्वाही जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्यानंतर हे आत्मक्लेश आंदोलन मागे घेण्यात आले.
आज बुधवार २३ सप्टेंबर रोजी रविकांत तुपकर हे त्यांच्या काही कार्यकर्त्यांसह नुकसानीची पाहणी करत करत परडा येथील मक्याचे नुकसान झालेल्या नारायण भिवटे यांच्या शेतात पोहोचले. तेथे शेतकऱ्यांचे अनावर झालेले अश्रू पाहून त्यांना या परिस्थीतीत आता टोकाचा निर्णय  घेतल्याशिवाय पर्याय नाही, या विचाराने तेथेच त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शेतात गाडून घेण्याचा निर्णय घेतला. यावेळी त्यांच्यासह शे.रफीक शे.करीम, सैय्यद वसीम व दत्ता पाटील यांनीही खड्डे करून गाढून घेतले.या आंदोलनाची वार्ता वाऱ्यासारखी पसरताच स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी व परिसरातील शेतकऱ्यांनी आंदोलन स्थळी तिकडे धाव घेतली. आर.सी.पी. सह पोलिसांची मोठी कुमक आंदोलनस्थळी पोहोचली. चक्र फिरायला लागली. तहसीलदार ठाणेदार प्रशासनासह तिथे पोहोचले. तहसीलदार कुमरे व ठाणेदार गरुडे यांनी तुपकरांना बाहेर काढण्यासाठी खूप विनावण्या केल्या पंरतु तुपकर भूमिकेवर अडून राहिल्याने प्रशासनाची तारांबळ उडाली. शेवटी जिल्हा प्रशासनाच्या वतीने उपजिल्हाधिकारी भूषण अहिरे आंदोलनस्थळी दाखल झाले. त्यांनी तूपकरांशी सविस्तर चर्चा केली. परंतू आजच्या आज मदतीचे आश्वासन मिळाल्याशिवाय माघार न घेण्याची भूमिका तुपकरांनी घेतल्यामूळे आंदोलनस्थळी चांगलाच तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हे आंदोलन तुपकरांनी जबरदस्ती बाहेर काढण्याचा प्रयत्न केला असता, कार्यकर्ते व पोलिसांमध्ये झटापट झाली याचवेळी चिडलेले स्वाभिमानी युवा आघाडीचे विदर्भ कार्याध्यक्ष राणा चंद्रशेखर चंदन यांनी अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी एकच धावपळ उडाली. आता हे आंदोलन हाताबाहेर जाऊ नये म्हणून, भूषण अहिरे यांनी दिलेल्या प्रस्तावांना मान्यता दिली व 3 दिवसांत जिल्ह्यातील संपूर्ण नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे संपवतो व नुकसान भरपाई मिळण्यासाठी शासनाने कडे तातडीने प्रस्ताव पाठवतो असे लेखी आश्वासन दिल्यानंतरच आंदोलन तूर्त स्थगित करण्याची भूमिका तूपकर यांनी घेतली. जर यानंतरही गांभीर्याने मागण्यांवर विचार झाला नाही तर हे आंदोलन राज्यभर अधिक तीव्र करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सततच्या अवकाळी पावसाने पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास पावसाने हिरावून घेतला आहे. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे तात्काळ पंचनामे करुन शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी २१ सप्टेंबरला जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
त्यावेळी त्यांनी दिलेल्या निवेदनात नमुद होते की, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सतत अवकाळी पाऊस सुरु आहे. सध्या काही ठिकाणी पिक काढणी सुरु आहे तर काही ठिकाणी पिके उभी आहे. अशावेळी झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावून घेतला आहे. याआधी ऑगस्टमध्ये झालेल्या पावसाने पिकांचे मोठे नुकसान होते त्यानंतर आता ऐन पिकांच्या काढणीच्या वेळी अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने पिके उध्वस्त झाली आहेत. मागील वर्षी रब्बी व खरीप हंगामातही अतिवृष्टी व गारपीटीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. त्यानंतर कोरोना लॉकडाऊनमुळे तसेच बोगस बियाणे व खतांच्या तुटवड्यामूळे शेतकऱ्यांना मोठा त्रास सोसावा लागला. आधीच चहुबाजूंनी संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांचे आता अवकाळी पावसाने कंबरडेच मोडले आहे. सोयाबीन, कपाशी, मका, ज्वारी यासह अन्य पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना तत्काळ दिलासा देण्याची गरज आहे. सरकारने शेतकऱ्यांना मदत केली नाही तर शेतकऱ्यांच्या आत्महत्या मोठ्या प्रमाणात वाढतील. त्यामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वे करुन शेतकऱ्यांना हेक्टरी २५ हजार रुपयांची नुकसान भरपाई द्यावा, अशी माणगी रविकांत तुपकर यांनी केलेली आहे. आंदोलना दरम्यान पवन देशमुख, महेंद्र जाधव, आकाश माळोदे, प्रदीप शेळके, चंदू गवई, गजानन गवळी, दत्ता शिंबरे, निलेश पुरभे, हिम्मत जाधव, जाबीर खान, सय्यद इमरान, नितीन पुरभे, भागवत धोरण, संतोष गवळी यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
अन् राणा चंदन यांनी घेतले अंगावर पेट्रोल..
जमिनीत गाडून घेणाऱ्या या आत्मक्लेश आंदोलनाने वातावरण चांगलेच गरम केले होते. हे आंदोलन मोडित काढण्याचा प्रयत्न पोलिस प्रशासनाने केला असता, त्याच ठिकाणी अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न स्वाभिमानी युवा विदर्भ कार्याध्यक्ष चंद्रशेखर चंदन यांनी करताच एकच धावपळ उडाली. या आंदोलना दरम्यान तब्बल साडेतीन तास जमिनीत गाडून घेतल्याने, आंदोलनस्थळी पोहोचलेल्या वैद्यकीय चमूने तपासणी केली असता रविकांत तूपकर यांची ‘ऑक्सिजन लेव्हल’ कमी होऊन त्यांचा रक्तदाबही वाढलेला होता. तर अन्य तीन कार्यकर्त्यांना प्रकृतीचा त्रास जाणवू लागल्याने त्यांना मोताळा येथील रुग्णालयात भरती करण्यात आले.

Leave a Comment