यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे “पैशांवर निवडणुका जिंकता आल्या असत्या तर टाटा-बिर्ला पंतप्रधान झाले असते. अंबानी असो की गरीब माणूस, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला एकाच मताचा अधिकार मिळाला. पैशांपेक्षाही जनतेशी असलेल्या थेट संपर्कामुळेच निवडणुकीत विजय होत असतो, हे सत्य आहे. त्यामुळे बुथ कमिट्या पुर्ण कराव्यात. नेते आणि कार्यकर्ते यांच्यात समन्वय असावा.”, असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष ना. जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेनिमित्त पाचोरा विधानसभा मतदारसंघात संपन्न झालेल्या आढावा बैठकी दरम्यान केले.
कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रदेशाध्यक्ष म्हणाले की, “भाजपने शेतकरी आणि कामगार वर्गाला नाराज केले आहे. २०२४ च्या निवडणुकीत भाजपला मतदान मिळणे अवघड होईल. त्यामुळे कार्यकर्त्यांनी आतापासूनच कामाला लागावे. पक्ष वाढवावा.” यावेळी त्यांनी स्वतःच्या मतदारसंघाचे उदाहरण देताना सांगितले की, मी माझ्या मतदारसंघात फार प्रचार करत नाही. माझ्या कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे निवडणूक सोपी होते.
यावेळी ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी भाजपवर जोरदार टीका केली. मागच्या काळातील सरकारने सत्तेचा माज आणि मस्ती दाखवली. त्यामुळेच जनतेने त्यांचा अहंकार बुडवला. देवेंद्र फडणवीस कितीही पुन्हा येईन म्हणाले तरी ते पुन्हा येणार नाहीत. त्यामुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी सतत कार्यरत राहावे. संघटना वाढवावी, असे मत खडसे यांनी व्यक्त केले.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे, माजी मंत्री गुलाबराव देवकर, माजी आमदार दिलीप वाघ, माजी आमदार मनिष जैन, रविंद्र भैय्या पाटील, माजी खासदार मोरे काका, उमेश पाटील, अर्जुन टिळे, युवक जिल्हाध्यक्ष रविंद्र पाटील, युवती जिल्हाध्यक्ष कल्पीता पाटील, महिला जिल्हाध्यक्ष कल्पना पाटील, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष रोहन सोनवणे, वंदना चौधरी, रिता बाविस्कर, राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष रूपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनिल गव्हाणे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.