पद धुवूनि, मुलांच्या आसवांची झाली फुले : शेतकरी कुटुंबीयांनी दिवंगत वडिलांचा शब्द पाळत व्यक्त केली कृतज्ञता : कोथळीत घडला ‘न भूतो, न भविष्यती’ भावूक प्रसंग
बुलडाणा, मोताळा तालुक्यातील कोथळीचे रहिवासी, ज्ञानी, अभ्यासक, वजनदार व्यक्तिमत्व, हाडाचे शेतकरी मनोहरराव पाटील पाच दिवसांपूर्वी निर्वाणस्थ झाले. आपल्या ८४ वर्षांच्या हयातीत त्यांनी अनेक गोड, कटू अनुभव घेतले. अनेक राजकीय नेते, पदाधिकारी त्यांनी पाहिले. अनेकांना त्यांनी मोठे केले. पण, मिसरुड फुटले नव्हते, त्या किशोरवयीन दशेपासूनच शेतकऱ्यांसाठी सावळ्यातील चंद्रदास तुपकर या शेतकऱ्याचं पोर कष्टकऱ्यांसाठी मर मर करतंय हे मनोहररावांनी वारंवार अनुभवले. तेव्हापासूनच तो शेतकरीपुत्र अर्थात आजचे राज्यस्तरीय शेतकरी नेते रविकांत तुपकर यांना मनोहर पाटलांनी आपल्या काळजात देवरुपी स्थान दिले. शेतकऱ्यांच्या भल्याकरिता दिवस-रात्र न पाहता आपला देह झिजवतो याची जाण कुणी ठेवो की न ठेवो, मात्र पाटील परिवाराने समस्त शेतकरीबांधवांतर्फे रविकांत तुपकर यांचे पाय धुवून, कुंकू लाऊन पूजन करावे व पायांवर फुले टाकावीत व पूजन केलेले पाणी तुळशी वृंदावनात टाकावे अशी इच्छा स्व.मनोहररावांनी मृत्युच्या २-३ दिवसाआधी मुलाकडे व्यक्त केली होती. रविकांत तुपकर जेंव्हा जेंव्हा कोथळीत येतील तेंव्हा तेंव्हा त्यांचे अश्याच पद्धतीने पदपूजन करावे असेही मनोहररावांनी सांगून ठेवले. आपल्या दिवंगत वडिलांची अंतिम इच्छा पूर्ण करूनच त्यांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली मिळेल हे मुलगा विठ्ठल पाटलांनी हेरले व मनोहररावांना खऱ्या अर्थाने आदरांजली वाहण्यासाठी सांत्वनपर भेटीसाठी आलेल्या रविकांत तुपकरांचे पाद्यपूजन करण्यात आले. एवढ्या दु:खदप्रसंगी वडिलांची इच्छापूर्ती करून पाटील कुटुंबीयांनी तुपकरांना देवाच्या स्थानी मानले. या मानाकरिता आपली पात्रता नाही हे सांगत तुपकर कायम विरोध करत होते. पण, देवाचा धावा काय असतो याचा प्रत्यय देत पाटील कुटुंबीयांनी भक्ति प्रकट करून शेतकऱ्यांच्या देवाला प्रणाम केला. भावूक प्रसंगाला नि:शब्द होत तुपकर सामोरे गेले अन् त्यांना गहिवरून आले.
आजपर्यंतच्या इतिहासात कुण्या नेत्याचे पाय धुवून अशी कृतज्ञता व्यक्त करण्यात आली नाही, किंवा मृत्यूवेळी अशी इच्छाही कोणी सहसा व्यक्त करत नाही. पण जो प्रसंग घडला तो ‘न भूतो, न भविष्यती’ प्रसंग होता. स्व.मनोहरराव यांचे चिरंजीव पोलीस पाटील विठ्ठल पाटील, त्यांची मुले व सुनेने बळीराजासाठी झटणाऱ्या नेत्याचे पाय धुवून ऋणातून ऊतराई होण्याच्या भावनिक प्रसंगावर जिल्हाभर सकारात्मक प्रतिक्रिया उमटल्या. विठ्ठल पाटील हे गावचे पोलीस पाटील तर आहेत पण पोलीस पाटील संघटनेचे नेतेही आहेत. पाटील घराण्याचे परिसरामध्ये मोठे वजन आहे. वडिलांमध्ये विठ्ठलरावांचा खूप जीव होता. विठ्ठल पाटलांनी वडिलांची इच्छा पूर्ण करत तुपकरांचे पाद्यपूजन करून ‘पद धुवूनि, मुलांच्या आसवांची फुले झाली’, असा हा कृतज्ञतापूर्वक आदर केला. इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा, असा क्षण कोथळीवासीयांनी अनुभवला. ‘बोले तैसा चाले, त्याची वंदावी पावले’ या उक्तीनुसारच रविकांत तुपकर यांचे कार्य अविरत सुरू आहे.
चंदन कितीही जुने झाले तरी सुगंध द्यायचे सोडत नाही, तसा सुगंध आपल्या कार्यकर्तृत्वातून मनोहर पाटील यांनी जगाचा निरोप घेऊनही अवतीभोवती दरवळत ठेवला आहे. असंच चंदनासारखे झिजून रविकांत तुपकर हे शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना सुखाचे सुगंधी लेपन लावत आले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यात आपला बाप आणि त्या पित्याच्या उभ्या हयातीत साथ देणाऱ्या अर्धांगिनीत माय शोधणारे रविकांत तुपकर तमाम कास्तकारांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत. त्यांच्याविषयी लहान, थोरांमध्ये आदराची भावना आहे. ८४ वर्षांच्या अनुभवाची शिदोरी घेऊन जगलेले मनोहर पाटील यांनी रविकांत तुपकरांच्या कार्याची जाण ठेऊनच आपल्या पश्चात मुलगा व त्याची मुले, सुनांनी तुपकरांचा देवासारखा धावा करण्याचा जिवंतपणी उपदेश दिला. त्यांच्या शिकवणीचे आचरण करत विठ्ठल पाटील, त्यांचा मुलगा व सुनेने तुपकरांचे पाय धुवून गुलाबपुष्पांनी पूजन केले. हे पाणी नंतर तुळशी वृंदावनात सोडण्यात आले.
एखादी व्यक्ती एवढी सेवा देते की मर्यादेपलीकडे. संकट असो वा आनंदीक्षण, सर्वच ठिकाणी पाठीराखा म्हणून धावून जाणाऱ्या व्यक्तीबद्दल आदरच असतो. त्याचे पाय धुवून पाणी पिले तरी पांग फेडू शकणार नाही, असे लोक उदाहरणादाखल बोलत असतात. अगदी ते खरेच असल्याचे यावरून दिसून येते.
तुपकरांची भविष्यातील जबाबदारी वाढली
दिवंगत मनोहरराव पाटील या बाबांनी जिवंतपणी त्यांच्या हृदयात जागा दिली. शेतकऱ्यांसाठी धडपड करतो म्हणून त्यांच्या कुटुंबीयांनी दु:खद प्रसंगीदेखील माझे औक्षण, पूजन करून माझ्यावर आता मोठी जबाबदारी सोपविली आहे. आज ते या दुनियेत नसले तरी त्यांचा आशीर्वाद कायम माझ्या पाठीशी राहील. माझी या आदरासाठी लायकी नाही. पण, त्या कुटुंबीयांचा मोठेपणा आहे. हा प्रसंग माझ्या आयुष्याला कलाटणी देणारा आहे व तितकीच माझी जबाबदारी वाढविणाराही आहे. त्यांच्या कृतार्थ भावनेने मला आपल्या शेतकरीबांधवांसाठी काम करण्याचे मोठे बळ मिळाले आहे, या कुटुंबाला किंवा शेतकऱ्यांना पश्चाताप होईल असे मी कधीही वागणार नाही. अशी प्रतिक्रिया रविकांत तुपकर यांनी ‘पुण्यनगरी’शी बोलताना व्यक्त केली.
रुढी, परंपरांना दिला छेद
मनोहर पाटील यांनी मुलगा विठ्ठल यांना, ‘मी या जगात नसेल तेव्हा रविकांत तुपकर यांना घरी बोलावून त्यांचे पाय धुवून व पूजन करून जोडीने दर्शन घ्यावे’ असे सुचविले होते. निधनाच्या चौथ्या दिवशी तुपकर कोथळीत पोहोचले. पाटील कुटुंबीयांना दु:खातून सावरण्याची ईश्वर शक्ती देवो म्हणत तुपकर यांनी धीर दिला. मनोहर पाटील यांच्या प्रतिमेचे पूजन करणार तोच विठ्ठल पाटील यांनी बाबांनी मरणाअगोदर व्यक्ती केलेली इच्छा सांगितली. शेतकऱ्यांसाठी लढणाऱ्या देवमाणसाची पूजा केली तरच बाबांना खरी श्रद्धांजली ठरेल व त्यांचा शब्द मला पूर्ण करायचा आहे असा आग्रह त्यांनी धरला.मी एवढा मोठा नाही, तुम्ही एवढ्या उंचीचा मान मला देऊ नका, मी सामान्य कार्यकर्ता आहे आणि मायबाप शेतकऱ्यांसाठी मी प्राणपणाने लढत न्याय देईल, ते माझे कर्तव्यच आहे, असे तुपकर वारंवार सांगत राहिले. बाबांना श्रद्धांजली द्यायची असेल तर आम्हाला तुमचे पाद्यपूजन करावेच लागेल असे म्हणत पाटील कुटुंबीयांनी त्यांचे काही एक न ऐकता पाद्यपूजन करून पाणी तुळशी वृंदावनात सोडले. एखाद्या शेतकरी नेत्याविषयी कास्तकाराचे कुटुंबीय एवढे निस्सीम प्रेम करते याची प्रत्यक्षात अनुभूती आली. विशेष म्हणजे घरातील व्यक्तीचे निधन झाल्यानंतर सूतक पाळले जाते. भाळी कुंकू लावले जात नाही. पाणी धरणाऱ्यांना जागचे उठता येत नाही. तरीदेखील सर्व रुढी, परंपरांना फाटा देत पाटील कुटुंबीयांनी स्व.मनोहररावांच्या शब्दांचा मान ठेवला आणि उपस्थित सर्वांच्या डोळ्यांत अश्रू तरळले.
तुपकरांनी पूजनाला विरोध केला पण….
मी खूप छोटा कार्यकर्ता आहे. मला एवढ्या उंचीचा सन्मान देऊ नका मी फक्त शेतकरी चळवळीचे काम करतो. कृपया माझे पूजन करू नका. अशी हात जोडून विनंती रविकांत तुपकरांनी विठ्ठल पाटील यांना केली. परंतु आमच्या वडिलांनी मृत्यूपूर्वी तुमचे नेहमी करिता पदपूजन करून सन्मान करण्याची इच्छा व्यक्त केली होती ती आम्हाला पूर्ण करावीच लागेल आणि ते भविष्यातही आम्ही करत राहू, तीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल ! आमचे वडील जिवंत माणसात देव बघत होते आणि ते तुम्हाला खूप मानत होते. त्यामुळे पाटील कुटुंबाच्या भावनांचा विचार करावा असे विठ्ठलरावांनी सांगितले. प्रसंगच इतका भावनिक होता की प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू होते. तुपकर निशब्द झाले होते. एवढ्या दुखातही पाटील कुटुंबाने तुपकरांची इच्छा नसतानाही पाद्यपूजन करून वडिलांची इच्छा पूर्ण केली.