गोंदिया-शैलेश राजनकर
तिरोडा,01- शेतकरी समृद्ध आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा आपला मानस आहे. यासाठी आपण प्रयत्नरत आहो. जिल्ह्यातील सिंचन सुविधेत वाढ करण्याच्या दृष्टीकोनातून प्रलंबित प्रकरणांची कामे लावण्यात येत आहे. यासाठी बावनथडी, सोंड्याटोला, धापेवाडा हे प्रकल्प पूर्ण करण्यात आले असून धापेवाड्याचे उर्वरित काम आणि गोंदिया तालुक्यातील अनेक उपसा सिंचनाचा मार्ग मोकळा करुन हरितक्रांती परिसरात दिसून येणार असल्याचे प्रतिपादन राष्ट्रवादीचे नेते खासदार प्रफुल पटेल यांनी केले. तिरोडा येथील कुंभारे लाॅन येथे आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पदाधिकारी-कार्यकर्ता बैठकीत ते शनिवारी बोलत होते. खासदार पटेल म्हणाले, शेतकऱ्यांना गतवर्षी प्रमाणे यंदाही धानाला ७०० रुपये बोनस देण्यात येईल. धानाचे विक्रमी उत्पादन यावर्षी झाले. त्यामुळे अधिकची मदत अंदाजे १४०० कोटी रूपये बोनस शेतकऱ्यांना मिळणार आहे. शेतकऱ्यांना सिंचनाची सोय व्हावी, यासाठी जिल्ह्यातील महत्वपूर्ण प्रकल्पांचे काम पूर्णत्वास आली आहे. याचा लाभ शेतकऱ्यांना निश्चितच होणार आहे, असे खासदार प्रफुल पटेल यांनी सांगितले. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी जोमाने कामाला लागल्याचे आवाहन त्यांनी केले. याप्रसंगी शासनातर्फे धानाला २५८८ रुपये बोनससह भाव मिळवून दिल्याबद्दल शेतकऱ्यांकडून खासदार प्रफुल पटेल यांचे आभार मानण्यात आले.सभेचे प्रास्तविक जिल्हाध्यक्ष पंचम बिसेन यांनी केले.सभेला माजी खासदार डाॅ. खुशालचंद्र बोपचे,माजी आमदार राजेंद्र जैन, महिला जिल्हाध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर,माजी सभापती निता रहागंडाले,रायुकाँ नेता रविकांत बोपचे,माजी नगराध्यक्ष अजय गौर,तालुकाध्यक्ष प्रेम रहागंडाले आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.