– जिल्हाधिकारी एस रामामूर्ती
ग्रामपंचायत निवडणूक आढावा बैठक
अजहर शाह मोताळा प्रतिनिधी
बुलडाणा,(जिमाका) दि.16 : जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. गवागावात निवडणूकीचे वारे वाहत आहेत. प्रभागनिहाय उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. अशा परिस्थितीत स्थानिक पातळीवर आदर्श आचार संहीतेचे पालन महत्वाचे आहे. तरी या निवडणूकीत आदर्श आचार संहीतेचे काटेकोरपणे पालन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी एस रामामूर्ती यांनी दिल्या आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन समिती सभागृहात ग्रामपंचायत निवडणूकीच्या अनुषंगाने आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले. त्यावेळी आढावा घेताना जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी दिनेश गिते, उपजिल्हाधिकारी अभिजीत नाईक उपस्थित होते. तर सभागृहात उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) राजेश लोखंडे, पोलीस अधिकारी, उपविभागीय अधिकारी, तहसिलदार आदींसह संबंधीत यंत्रणांचे अधिकारी उपस्थित होते.
ग्रामपंचायत निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया संगणकीय प्रणालीद्वारे करण्यात येणार असल्याचे सांगत जिल्हाधिकारी एस रामामूर्ती म्हणाले, याबाबत सुचना मिळाल्यानुसार कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण घेण्यात यावे. तसेच पोलीस यंत्रणेने संवेदनशील गावांमध्ये सदर निवडणूक शांततापूर्वक मार्गाने पार पाडण्यासाठी आवश्यक ती कार्यवाही करावी. सर्व यंत्रणांनी समन्वय राखून निवडणूका यशस्वीरित्या पार पाडाव्यात. कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण न होण्यासाठी काळजी घ्यावी.
बैठकीला संबंधीत यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.