आयुषी दुबे शेगाव
शेगाव कालखेड रोडवर बुरूंगले चारचाकी दुधाचे वाहन व दुचाकीची अमोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात 37 वर्षीय दुचाकीचालक गंभीर जखमी झाला असून दुचाकीवर बसलेला त्यांचा 5 वर्षीय चिमुकला जागीच मृत पावला. ही घटना आज दुपारी 12.30 वाजता सुमारास कालखेड रोडवर बुरूंगले कॉन्व्हेंटच्या जवळपास घडली. अपघातानंतर चारचाकी वाहनाचा चालक तुरीच्या शेतात पळत जावून फरार झाला तर घटनास्थळाजवळ काही अंतरावर उपस्थित कालखेडच्या दोन युवकांनी जखमींना सईबाई मोटे रूग्णालयात पोहचविण्याचे मदतकार्य केले.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार पातुर्डा येथील दुधाची वाहतूक करणारे वाहन(एमएच28 एबी 5193) शेगाववरून पातुर्ड्याला परत जात असताना कालखेडरोडवरील बुरूंगले कॉन्व्हेंटच्या जवळपास विरूध्द दिशेने येत असलेल्या एका दुचाकीला धडकले. हा अपघात एवढा भयंकर झाला की, दुचाकीवर बसलेला 5 वर्षीय अभिजीत युवराज खोंड हा चिमुकला गंभीर जखमी होवून जागीच ठार झाला. तर दुचाकीचालक युवराज भिकाजी खोंड(37)रा.कुंदेगाव ता.संग्रामपूर हे या अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. घटनेच्यावेळी घटनास्थळापासून काही अंतरावर उपस्थित असलेले कालखेड येथील विजय हेलोडे(25) व सुरज सरदार वय 28 यांनी वेळीच समयसुचकता ठेवून या घटनेतील जखमींना एका वाहनात टाकून सईबाई मोटे रूग्णालयात पोहचविले. मात्र तोपर्यंत अभिजीतची प्राणज्योत मालविली होती. तर युवराज खोंड यांच्या डोक्याला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचेवर प्राथमिक उपचार करून त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दुधाची वाहतूक करणारे वाहन पातुर्डा येथील वडे यांचे असल्याचे समजते.
घटनेची माहिती शहर पोलिसांना मिळाल्यानंतर एएसआय श्याम पवार, पोकॉ मंगेश सोळंके, अजय शिरसोले यांनी घटनास्थळी पोहोचून घटनास्थळाचा पंचनामा केला असून घटनेचा पुढील तपास करीत आहेत.