गजानन सोनटक्के जळगाव जा
शेतकऱ्याच्या कृषिपंपाचे विजकनेक्शन जोडताना महावितरणच्या जामोद उपकेंद्रातील कंत्राटी वायरमन तरुणाला विजेचा शॉक लागला. त्याची प्रकृती गंभीर बनली. उपचाराला नेतानाच वाटेत त्याचा मृत्यू झाला. आज, ३ डिसेंबरला दुपारी तीनच्या सुमारास जळगाव जामोद तालुक्यातील शिवापूर शिवारात ही घटना घडली. विलास रामकृष्ण बोडखे (३२, रा. जामोद) असे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे.
विलास बोडखे हा महावितरणच्या जळगाव जामोद उपकेंद्रात आऊटसोर्सिंग कंत्राटी कर्मचारी म्हणून काम करत होता. आज शिवापूर शिवारात कृषी पंपांचे कनेक्शन जोडत असताना अचानक गावठाणामधील विद्युत पुरवठा सुरू झाल्याने तो कोसळला. गंभीर जखमी झाल्याने त्याला जामोद येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. तिथून पुढील उपचारासाठी हलविण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला. प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णवाहिका असूनही चालक उपस्थित नसल्याने खासगी वाहनाने जळगाव जामोद येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. दीड महिन्यापूर्वीच विलासच्या वडिलांचे अपघाती निधन झाले होते, तर त्याची आईसुद्धा त्या अपघातात गंभीर जखमी झाली होती. सर्वांशी मनमिळावू व शांत स्वभाव असलेला विलास रात्री बेरात्री शेतातील वीजपुरवठा खंडित झाल्यास सुरळीत करून देत होता. त्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.