आ.रवी राणांचे जेलमध्ये अन्नत्याग तर खा.नवनीत राणांचे जेलबाहेर धरणे आंदोलन 

 

अमरावती :-  सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात बऱ्याच महत्वाच्या घडामोडी घडत आहेत. विरोधी पक्ष नेते सत्ताधारी पक्षाला टार्गेट करण्याचा एकही मुद्दा सोडत नाही. अशातच आता अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी रास्तारोको आंदोलन केले होते.
रास्तारोको आंदोलन करणाऱ्या रवी राणा यांना अमरावती पोलिसांनी अ.टक केलं आहे. ऐन दिवाळीतील आजचा महत्वाचा दिवस देखील रवी राणा यांना कारागृहातंच काढावा लागणार आहे. अमरावती पोलिसांनी रवी राणा यांच्यावर केलेल्या कारवाई विरोधात रवी राणा यांच्या पत्नी खासदार नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेरच धरणे आंदोलन केलं आहे
खा. नवनीत राणा आज सकाळी रवी राणा यांना भेटण्यासाठी कारागृहात गेल्या होत्या. मात्र, अमरावती पोलिसांनी त्यांना भेटू दिलं नाही. यावेळी नवनीत राणा फार संतप्त झाल्या होत्या. त्यांची यावेळी अमरावती पोलिसांबर चांगलीच बाचाबाची देखील झाली.
संतप्त झालेल्या नवनीत राणा यांनी यावेळी कारागृहाबाहेरच धरणे आंदोलन सुरू केले. जोपर्यंत रवी राणा यांची भेट होणार नाही तोपर्यंत मी कारागृहाबाहेरच धरणे आंदोलन करणार आहे, असा इशारा नवनीत राणा यांनी पोलिसांना दिला आहे.
एकीकडे नवनीत राणा यांनी कारागृहाबाहेर धरणे आंदोलन सुरू केले आहे. तर दुसरीकडे पोलिसांनी अट.क करताच रवी राणा यांनी कारागृहात अन्नत्याग केला आहे. आता याप्रकरणी पुढे काय होतंय हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
दरम्यान, अमरावती पोलिसांनी भाजपच्या एका आमदारावर ऐन दिवाळीत कारवाई केल्यानं अनेक भाजप नेते याचा निषेध व्यक्त करत आहेत. भाजप नेते सोशल मीडियावरून महाविकास आघाडी सरकारवर देखील यावरून निशाणा साधत आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील या कारवाईचा निषेध व्यक्त केला आहे. यासंबंधीत देवेंद्र फडणवीस यांनी एक ट्विट केलं आहे.
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी आणि त्यांना तातडीने मदत मिळावी यासाठी आमदार रवी राणा यांनी सुद्धा जेलभरो आंदोलन केले. आमदार रवी राणा हे तर आजही दिवाळीच्या दिवशी कारागृहात आहेत. शेतकऱ्यांची दिवाळी काळी करणाऱ्या राज्य सरकारचा आम्ही निषेध करतो, अशा शब्दात फडणवीस यांनी राज्य सरकारचा निषेध केला आहे.

Leave a Comment