पत्रकार परिषदेचे ४१वे राष्ट्रीय अधिवेशन शेगाव येथे १९ व २० ऑगस्ट २०१७ रोजी झाले होते. त्याला आज ४ वर्ष पुर्ण होत असून, त्यानिमित्ताने कर्मयोगी शिवशंकरभाऊ पाटील यांचा त्यासंदर्भातल्या आठवणींना हा उजाळा!
मराठी पत्रकार परिषदेचं ४१वं अधिवेशन घेण्याचं ठरलं, ते शेगावात.. अवघ्या २२ दिवसातच तयारीचं शिवधनुष्य पेलायचं होतं.. परिषदेचे तत्कालीन अध्यक्ष एस.एम.देशमुख सरांनी माझ्यावर जबाबदारी टाकली म्हणण्यापेक्षा, मीच ती जबाबदारी मागून घेतली. शेगावला अधिवेशन होणार म्हटल्यावर ते ‘राष्ट्रीय’ व्हावं, हा संकल्प घेवून शिवशंकरभाऊ पाटील ज्यांच्याशी सातत्याने वैद्यकीय हितगुज करत.. ते आयुर्वेदतज्ञ डॉ. गजानन पडघान यांना घेवून मी राजेंद्र काळे व सकाळचे पत्रकार अरुण जैन आम्ही पहिल्यांदा शिवशंकरभाऊ म्हणजे भाऊसाहेबांकडे गेलो.
_साहित्यीक अन् पत्रकारांची अधिवेशनं, म्हणजे १२ भानगडी.. असा भाऊंचा ग्रह विविध अधिवेशनांवरुन झालेलाच होता. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन घेतलं असतं, पण नको त्या दीडशहाण्या कटकटी.. म्हणून भाऊसाहेबांनी अशा अधिवेशनांकडे कानाडोळा केला. त्यामुळे भाऊसाहेब अधिवेशनाला परवानगी देतील की नाही? ही मोठी धास्ती होती. इंजिनिअरींग कॉलेजचा प्रशस्त हॉल, आनंदविसावा व आनंदविहार ही २ भक्तनिवास, चहा-नाश्ता-जेवणाची व्यवस्था असं कार्यक्रमासह राहण्या-खाण्याची व्यवस्था संस्थानची हवी.. संस्थान असल्यामुळे ते नि:शुल्कही नको होतं._
भाऊसाहेबांनी प्रस्ताव ऐकून घेतला, जवळपास ५ मिनीट शांत. अर्थात त्यांची शांतता आमची धडपड वाढविणारी. ‘अधिवेशन घ्या, पण संस्थानची शिस्त पाळून..’ या त्यांच्या बोलण्याने आमच्या आनंदाला पारावर राहीला नाही. फक्त प्रश्न होता, शिस्त अन् पत्रकारांनी पाळायची? तेही अधिवेशनात.. कारण आजवरच्या अनेक अधिवेशनाचा अनुभव हा मौज-मस्ती, खाओ-पियोचा. मी एस.एम.सरांना फोन केला- ‘आपल्याला अधिवेशनात शिस्त पाळावी लागेल!’ क्षणात एस.एम.सरांचे उत्तर होते- ‘मीच बेशिस्त खपवून घेणार नाही..’ मग आम्ही म्हणजे आयोजक असणारा बुलडाणा जिल्हा पत्रकार संघ मग रिलॅक्स झाला. पुढच्या अधिवेशनाच्या प्रत्येक पोस्टमध्ये उल्लेख असायचा, संस्थानच्या शिस्तीचा अन् वस्तुस्थिती सांगतो- शेगाव संस्थानच्या कोणत्याही आवारात प्रवेश केल्यानंतर माणूस शिस्तीप्रती एवढा जागरुक होवून जातो की, बेशिस्तपणा कुणालाच आवडत नाही. त्याचे प्रत्यंतरतर अधिवेशनात ठायी-ठायी आले. अगदी वेळेवर उद्घाटन सोहळा, तत्पुर्वी शिस्तप्रिय पत्रदिंडी, प्रत्येक परिसंवाद अन् चर्चासत्र वेळेवर.. जी वेळ साधारणत: कुठल्याही अधिवेशनात पाळली जात नाही, ती काटेकोरपणे मराठी पत्रकार परिषदेच्या ४१व्या ‘राष्ट्रीय’ अधिवेशनात पाळली गेली.. ती फक्त ‘श्रीं’ची कृपा!
_शेगावला अधिवेशन होणार म्हटल्यावर, उद्घाटक शिवशंकरभाऊच असावेत.. असा सर्वांचा आग्रह. आम्ही तो प्रस्ताव आधी भाऊंपुढे ठेवला, ‘तुम्हाला अधिवेशन घ्यायचे की नाही?’ एवढेच भाऊ बोलले अन् आम्हीही समजून गेलो. मग आम्ही भाऊंना पाहुणे म्हणूनतर सोडा पण उपस्थित राहण्याचाही आग्रह केला नाही. मग उद्घाटक कोण? साधारणत: राजकीय नेता नको, अशी भावना होती.. मग नाव पुढे आले, साईबाबा संस्थान शिर्डीचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावरे यांचे. त्यांनी नम्रपणे होकार दिला. त्यांनीच उद्घाटनपर मनोगतात ‘मंदीर व्यवस्थापन’ हा विषय प्रथमच पत्रकारांपुढे मांडून शेगावच्या मंदीर व्यवस्थापनावर स्तुतीसुमनांचा वर्षावच केला. विशेष म्हणजे शिवशंकरभाऊ अधिावेशनास्थळी नसतांनाही, प्रत्येक कार्यक्रमांचे अपडेटस् व कोण काय बोलले? याची इत्यंभूत माहिती त्यांच्याकडे पोहचत होती._
१९ व २० ऑगस्ट २०१७ या २ दिवसात संतनगरीत पत्रकारांची मांदीयाळी जमली होती, व त्यामुळे उपस्थित दीड हजारावर पत्रकारांना शेगाव संस्थान जवळून बघण्याची अनुभूती आली. पत्रकारांनी अगदी सहपरिवार ‘आनंदसागर’ बघून अनुभूती घेतली,
_आनंदाचे डोही आनंद तरंग!_
_जे अधिवेशन घ्यायला २० ते २५ लाख रुपये लागले असते, ते २ दिवशीय राष्ट्रीय अधिवेशन.. आधीच संस्थानचे शुल्क कमी, त्यात ५० टक्के सवलत.. म्हणजे केवळ ५ लाख रुपयात बुलडाणा जिल्हा पत्रकार संघ घेवू शकला. विशेष म्हणजे हा निधीही थेट त्या- त्या सहकार्यकर्त्यांनी संस्थानला देणगी स्वरुपात जमा केला. म्हणजे गजानन महाराजांच्या शिकवणीप्रमाणे- ‘पैशाला हात लावू नका..’ अपवाद वगळलातर तसेच झाले. पावतीशिवाय अधिवेशन होवू शकते, याची जणु मिळाली पावतीच.. एवढे सर्व झाले शिवशंकरभाऊ यांच्यामुळे, भाऊ म्हणायचे- हे झाले महाराजांच्या कृपेमुळे.. तो कृपाशिर्वाद होताच !_
जय गजानन 🙏🙏
– राजेंद्र काळे मो.नं.९८२२५९३९२३