यावल ( प्रतिनिधी )विकी वानखेडे
प्रेमसंबंधातून अल्पवयीन मुलाने एका १९ वर्षीय तरूणीवर वारंवार अत्याचार करून गर्भवती राहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अल्पवयीन मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला ताब्यात घेतले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, यावल तालुक्यातील एका खेडेगावात १९ वर्षीय तरूणी ही आपल्या आईवडील व आजी सोबत वास्तव्याला आहे. शेतात मजूरीचे काम करून उदरनिर्वाह करते. गेल्या वर्षी किनगाव शिवारातील शेतात काम करत असतांना तरूणीची १६ वर्षीय अल्पवयीन मुलाशी ओळख झाली. त्यातून दोघांचे प्रेमसंबंध निर्माण झाले. दरम्यान, अल्पवयीन मुलाने तरूणीला शेतात बोलवून तिच्यावर वारंवार
अत्याचार केला. या अत्याचारातून तरूणी गर्भवती राहिली. हा प्रकार तिच्या नातेवाईकांना समजल्यावर त्यांना जबर धक्का बसला. पिडीतेसह तिच्या नातेवाईकांना यावल पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अल्पवयीन मुलावर यावल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुदाम काकडे करीत आहे.